गायीपासून प्राप्त होणाऱ्या पाच पदार्थांपासून बनविले जाणारे द्रावण म्ह्णून यास पंचगव्य असे संबोधण्यात येते. हे एक सेंद्रीय द्रावण आहे. जमीन...
गायीपासून प्राप्त होणाऱ्या पाच पदार्थांपासून बनविले जाणारे द्रावण म्ह्णून यास पंचगव्य असे संबोधण्यात येते. हे एक सेंद्रीय द्रावण आहे. जमीनीत आवश्यक जीवाणूंची वाढ, त्याद्वारे पिकाच्या उत्पादन व गुणवत्तेत वाढ, जमीनीची वाफसा स्थिती टिकवून ठेवणे, तसेच पिकात रोग प्रतिकार शक्ती निर्माण करण्याचे अद्भुत सामर्थ्य यात आहे. तयार होण्यासाठी लागणारा कालावधी जरी थोडासा जास्त असला तरी सहज उपलब्ध होणाऱ्या संसाधनांमुळे बवण्यास सोपी व स्वस्त अशी ही निविष्टा आहे.
साहित्य
देशी गायीचे शेण - ७ किलोदेशी गायीचे गोमुत्र - १० लिटर. शेण व गोमुत्र निव्वळ देशी गायीचेच असावे. देशी बैलाचे सुद्धा वापरू नये
देशी गायीचे तूप - १ किलो
दूध - ३ लिटर
दही - २ लिटर
कच्च्या नारळाचे पाणी - ३ लिटर
गुळ - ३ किलो
पिकलेली केळी - १ डझन
पाणी - १० लिटर
द्रावण बनविण्यासाठी योग्य आकाराचे मातीचे भांडे किंवा सिमेंटची टाकी अथवा प्लास्टिकचा ड्रम. वरील सर्व साहित्य साधारण पणे ४० लिटर इतके होइल. द्रावण बनताना किण्वन प्रक्रियेमुळे तयार होणारा फेस पात्राच्या बाहेर उतू जाऊ नये यासाठी दुप्पट आकाराचे भांडे अथवा ड्रम घ्यावा.
कृती
गायीचे शेण व तूप पात्रात एकत्र करावे व ३ दिवस एकजीव होऊ द्यावे.३ दिवसानंतर त्यात गोमुत्र व पाणी मिसळावे. अशा स्थितीत हे द्रावण १५ दिवस ठेवावे. यादरम्यान प्रत्येक दिवशी सकाळी व संध्याकाळी हे द्रावण व्यवस्थित काठीने ढवळावे.
१५ दिवसानंतर गायीचे दूध, दही, नारळ पाणी, गुळ कुस्करून व पिकलेली केळी सोलून टाकावीत. द्रावण ढवळून घ्यावे. व पुढील किण्वन प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी १५ दिवस लागतील. यादरम्यानही प्रत्येक दिवशी सकाळी व संध्याकाळी हे द्रावण व्यवस्थित काठीने ढवळावे. किण्वन प्रक्रियेमुळे तयार होणारा फेस पूर्णपणे खाली बसेपर्यंत ढवळावे. द्रावण तयार झाल्यापासून ६ महिन्यांपर्यंत वापरता येते. तयार झालेले द्रावण सावलीच्या ठिकाणी थंड जागेत ठेवावे. पंचगव्य साठवण्याकरीता धातूच्या भांड्यांचा वापर करू नये
कसे वापरावे
जमीनीतून देण्यासाठी १ एकरासाठी १० लिटर पंचगव्य ४०० लिटर पाण्यात मिसळून. पाट्पाण्याद्वारे द्यावे किंवा पिकाच्या मुळांजवळ शिंपडावे. शिंपडताना जमीन वाफसा स्थितीत असणे जरूरी आहे.नवीन रोप लागण करताना रोपाच्या मुळ्या पंचगव्य द्रावणात बुडवून लावावे.
पेरणीपूर्व बीज उपचारासाठी द्रावण बियाण्यांवर शिंपडून बियाणे ३० मिनीटांपर्यंत सावलीत वाळवून पेरावे. यामुळे अपायकारक बुरशीचा संसर्ग होत नाही व बियाण्यांची उगवण क्षमता वाढते.
याशिवाय मनुष्य रोग चिकित्सेमधेही पंचगव्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.
COMMENTS